रायगड -अलिबागच्या नारंगी गावातील डॉ. मनोज पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. पंधरा दिवस कोरोना बरोबर लढाई करून डॉ. पाटील हे सुखरूप आपल्या घरी आले आहेत. त्यावेळी गावकरी आणि नातेवाईकांनी वाजतगाजत व फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. कोरोनाला कमी लेखू नका, नियमांचे पालन करा आणि कोरोनाला हरवा, असा संदेश डॉ. पाटील यांनी सर्वांना दिला आहे. आपल्या परिसरातील कोरोना रुग्णांसाठी स्वत:च्या मल्हार रुग्णालयातच कोविड सेंटर उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉ. मनोज पाटील यांचे नारंगी येथे क्लिनिक आहे. दहा किलोमीटर परिसरात ते एकटेच डॉक्टर असल्याने सर्व नागरिक त्याच्याकडे उपचारासाठी येतात. रुग्णांवर उपचार करताना डॉ. मनोज पाटील यांना कोरोनाची बाधा झाली. स्वतः डॉक्टर असल्याने ते क्वारंन्टाईन राहिले होते. मात्र, त्यांच्या पत्नीलाही लागण झाली. पत्नीवर स्वतः उपचार करून त्यांनी तिला बरे केले.