पेण :पेण तालुक्यात 3 सप्टेंबर 1935 साली स्थापना झालेल्या पेण अर्बन बँकेचा सन 23 सप्टेंबर 2010 साली 795 कोटी 86 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 चे कलम 35 अ अन्वये अर्थिक निर्बंध लागू झाले होते. त्यानंतर 24 सप्टेंबर 2010 रोजी तातडीने पेण अर्बन बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या बँकेच्या भ्रष्टाचाराच्या घटनेनंतर आजपर्यंत 13 वर्षे झाली. पण, बँक सुरू झाली नाहीच, शिवाय बँकेच्या खातेदारांना व ठेवीदारांना त्यांची भरलेली मुद्दलही मिळाली नाही.
बोगस कर्जदारांना पैसे वाटप :बंँकेच्या कागदोपत्री 795 कोटी 86 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे, असे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र 49 कोटी 96 लाख रुपयांचे कागदोपत्री कर्जदार असून, बोगस कर्जदार ज्यांचे कोणतेही कागदपत्र नाही, असे 745 कोटी 90 लाख रुपयांचे खोट्या कर्जदारांच्या नावे कर्ज वाटप झाले आहे. तर पेण अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम अतिशय संथगतीने सुरू असून, यापैकी पेण अर्बन बँकेकडून आजतागायत 184 कोटी 71 लाखांचीच वसुली झाली आहे. तर 611 कोटी 15 लाख रुपये वसुली होणे बाकी आहे. शिवाय 01 एप्रिल 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 अखेर पेण अर्बन बँकेने कर्जदारांना एकरकमी परतफेड योजनेंंतर्गत प्राप्त झालेल्या 227 अर्जातून 2 कोटी 74 लाख रुपयांची वसुली केली आहे.
आतापर्यंत मिळालेले कर्ज :बँकेतील ठेवीदारांपेैकी उच्च न्यायालयाच्या 20 ऑगस्ट 2015 च्या आदेशानुसार आजपर्यंत 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम असणाऱ्या सर्व शाखांमधून 13 हजार 723 ठेवीदारांना 4 कोटी 95 लाख 8 हजार 211 रुपये, तर 25 हजार रुपयांपर्यंतच्या 9 हजार 632 ठेवीदरांना 12 कोटी 16 लाख 80 हजार 360 रुपयांपर्यत रकमा परत मिळाल्या आहेत.