पेण-रायगड : दि पेण को-आँपरेटीव्ह अर्बन बँकेत सुमारे 758 कोटीचा घोटाळा होऊन 11 वर्षे उलटून गेल्यानंतर देखील अर्बन बँकेच्या सुमारे 2 लाख ठेवीदारांना न्याय मिळाला नाही. न्याय न मिळाल्याने पीडित ठेवीदारांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक 2 मे 2022 रोजी पेण नगरपालिकेसमोरील हुतात्मा भाई कोतवाल चौकात पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समिती लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहे.
या आंदोलनात पेण अर्बन बँकेचे ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंन जाधव, सुरेश वैद्य, नगरसेवक अजय क्षिरसागर आदी उपस्थित होते.
काय आहे पेण बँकेचे प्रकरण
पेण अर्बन बँकेने सुमारे 60 व्यक्तींना 118 खात्यामार्फत कोट्यावधी रुपयांची नियमबाह्य कर्ज दिली. शिशिर धारकर, संतोष शृंगारपुरे, शर्मा यांनी आपल्या मित्र व नातेवाईकांना सुमारे 350 कोटींची बेकायदेशीर कर्ज दिली. यामुळे बँकेत 758 कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप नरेंन जाधव यांनी यावेळी केला. यासंदर्भात न्यायालयात ठेवीदारांतर्फे दाद मागण्यात आली.
16 डिसेंबर 2015 रोजी उच्च न्यायालयाने अफरातफर केलेले 598.72 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती समिती स्थापन केली. या समितीमध्ये रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक CBI, ED चे प्रतिनिधी, RBI चे अधिकारी, सहकार क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व ठेवीदार प्रतिनिधी व याचिकाकर्ता नरेन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा -पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत, पाच लाखांपर्यंतच्या ठेवी मिळणार परत
काय आहे समितीचे मुख्य काम
या समितीचे मुख्य काम अफरातफर केलेले 598.72 कोटी रुपये वसूल करणे व बँक पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करून ठेवीदारांना दिलासा देणे असे आहे. परंतु 598.72 कोटी रकमेपैकी केवळ 5.5 कोटी इतकीच रक्कम वसूल झाली आहे. न्यायालयाने घोटाळेबाज आरोपी व बड्या बोगस थकीत कर्जदारांवर कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी सांगितले होते. यापैकी काही मालमत्ता जप्त करण्यात आली खरी परंतु काही मालमत्तांचे परस्पर हस्तांतरण, बेकायदेशीररित्या विक्री सुरू आहे. यावर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासन व संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून बँक बुडव्यांना साथ देत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी लाक्षणिक धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तसेच शासनाने मे.प्रियेश लँड डेव्हलपर्स यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विरोध करणे, आक्षेप घेणे याकरिता आंदोलन छेडले असल्याचे नरेंन जाधव यांनी सांगितले.
आरोपी करतात जनतेची दिशाभूल
बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर हे जनतेची दिशाभूल करीत आहेत. बँकेची मालमत्ता विकण्याचे त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. या मालमत्ता धारक विकू शकत नाहीत. मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे धारकरांचे आश्वासन पूर्णतः खोटे आहे, असा दावा नगरसेवक अजय क्षिरसागर यांनी केला. शिशिर धारकर यांनी 2010 साली कबूल केल्याप्रमाणे दर महिना 50 कोटी प्रमाणे प्रथम बँकेचे पैसे भरावे व नंतरच राजकारण करावे असा सल्लाही अजय क्षिरसागर यांनी यावेळी दिला.
मालमत्तांवर दुहेरी बोजा
बँकेकडे कर्जदारांची जप्त केलेली मालमत्ता, बँकेची स्वतःची मालमत्ता, दोषी संचालकांची जप्त केलेली मालमत्ता व ठेवीदारांच्या पैशातून घेतलेल्या मालमत्ता अशा अनेक मालमत्ता आहेत. या मालमत्तांवर पेण अर्बन बँकेचे व ED चे बोझे आहेत. या मालमत्तांचे व्यवहार कोर्टाच्या देखरेखी खालीच होतील अशी माहिती नरेन जाधव यांनी दिली.
5 लाखांचे विमा संरक्षण मिळावे
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे. या कायद्यात कारवाई खाली असलेल्या बँकांना 5 लाख रुपयांचा विमा संरक्षण देण्याची तरतूद आहे. पेण अर्बन बँक अजून अवसायनात निघालेली नाही. त्यामुळे सदर तरतुदीनुसार पेण अर्बनच्या ठेवीदारांना 5 लाखांचे विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी अर्बन बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेन जाधव यांनी केली आहे.
हेही वाचा -पेण नगरपालिका निवडणुकीत दडपशाही चालू देणार नाही - शिशिर धारकर