रायगड : पेण बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी अलिबाग पोस्को न्यायालयात सुरू झाली आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज (सोमवार) अलिबाग पोस्को न्यायालयात हजर राहिले. त्यांनी आज आरोपींविरोधातील आरोप पत्रात गुन्ह्याची कलमे दाखल केली. विशेष पोस्को न्यायाधीश शेख यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे.
पेण शहरातील बलात्कार-हत्या प्रकरण -
पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीत अडीच वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना 29 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली होती. पेण पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा व्हावी आणि हा खटला जलदगती न्यायालयात सुरू करा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पेण पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपास करून अलिबाग न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले.
हेही वाचा -एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची घेतली भेट