महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड : पेणमधील बाप्पाच्या मूर्तींची परदेश वारी - रायगड बातमी

बाप्पांच्या परदेशवारीला अखेर सरकारची मान्यता मिळाली आहे. परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाइन नोंदणी केलेल्या ऑर्डरनुसार पेण तालुक्यामधील कार्यशाळांनी मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार गणेश मूर्ती पाठविण्यात आल्याचे कार्यशाळा मालकांनी सांगितले आहे. 2021 या वर्षातील गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असल्याने मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच ही ऑर्डर उशिरा का होईना, परंतु दिल्या जात असल्याने मूर्तीकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

बाप्पाच्या मूर्तींची परदेश वारी
बाप्पाच्या मूर्तींची परदेश वारी

By

Published : Jun 1, 2021, 8:09 PM IST

पेण (रायगड) -संपूर्ण जगात पेणच्या गणेशमूर्तींची ख्याती आहे. त्यामुळेच देश विदेशात गणेशमूर्तींना मागणी असते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे संकट असतानाही श्री गणेशाची परदेशवारी अर्थात सातासमुद्रापारचा प्रवास सुरू झाला आहे. पेण तालुक्याच्या काही गणेशमूर्ती शाळांमधून एकत्रित अशा शाडू मातीच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या हजारो गणेशमूर्ती अमेरिका, थायलंड आदी देशांमध्ये रवाना झाल्याची माहिती पेण येथील मूर्तिकार दीपक समेळ यांनी दिली आहे.

मूर्तीकार समाधानी

बाप्पांच्या परदेशवारीला अखेर सरकारची मान्यता मिळाली आहे. परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाइन नोंदणी केलेल्या ऑर्डरनुसार पेण तालुक्यामधील कार्यशाळांनी मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार गणेश मूर्ती पाठविण्यात आल्याचे कार्यशाळा मालकांनी सांगितले आहे. 2021 या वर्षातील गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असल्याने मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच ही ऑर्डर उशिरा का होईना, परंतु दिल्या जात असल्याने मूर्तीकारांनी समाधान व्यक्त केले आहे. मागीलवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाप्पांच्या परदेशवारीत खंड पडून गणेश मूर्तींची परदेश वारी न झाल्याने मूर्तीकारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यावर्षीही पुन्हा एकदा कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाली. एप्रिल महिन्यात मागणी केलेल्या गणेशमूर्तींची ऑर्डर अखेर मे महिन्याच्या अखेरीस जाण्यासाठी परवानगी मिळाल्याने पेणच्या मूर्तीकारांनी समाधान व्यक्त केला आहे.

कंटेनरने होणार बाप्पांचा प्रवास

40 फूट लांब कंटेनरमध्ये साधारण 1400 ते 1500 लहान मूर्ती सामावतात. दोन व पाच फूट उंचीच्या 400 ते 500 बाॅक्स कंटेनरमध्ये असून, अशा सतरा कंटेनरममधून हजारो गणेशमूर्तीनी परदेश गमनासाठी प्रस्थान केले आहे.

पीओपी बंदीमुळे लहान मूर्तीकारांना फटका

पेण तालुक्यातील काही मोठ्या गणेशमूर्ती व्यावसायिकांच्या मूर्त्या परदेशवारी करीत आहे. मात्र छोटे व्यावसायिक अजूनही ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र काही मूर्ती शाळांमध्ये दिसत आहे. पीओपी बंदीमुळे बाप्पाच्या मूर्ती घडविण्यात मोठा अडथळा येत असल्याचीही खंत कारखानदारांनी व्यक्त केली आहे.

...तर आर्थिक संकट

लॉकडाऊनचा फटका गणेश मूर्ती तयार करणाऱ्या छोट्या मूर्तीकार व सर्व कारागिरांना बसला आहे. दरवर्षी मार्च-एप्रिल महिना लागताच गणेश भक्तांकडून बाप्पाच्या मूर्तीची बुकिंग व्हायला सुरूवात होते. मात्र यंदा आतापर्यंत हातावर मोजन्या इतक्याच घरगुती गणपतींचे बुकिंग झाली आहे. सार्वजनिक मूर्ती मंडळाकडून बुकिंग केले नसल्याने त्या मूर्तिकारांचे लक्ष छोट्या-मोठ्या मंडळाकडे लागले आहे. मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चार फुटी उंचीच्या गणेश मूर्तींची स्थापना करावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्य सरकारने केली होती. त्यामुळे आधीच मोठ्या गणेश मूर्ती तयार करून बसलेल्या मूर्तिकारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसून तिसरी लाट येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेश मूर्तींच्या उंचीबाबत आताच नियमावली जाहीर करावी अन्यथा मागील वर्षाप्रमाणे यंदाही मूर्तिकारांना पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल, असे मूर्तिकार वैभव धुमाळ यांनी सांगितले आहे.

'शासनाने नियमावली जाहीर करावी'

मागीलवर्षी पेणमधील जवळपास 70 ते 80 टक्के मूर्तिकारांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. आजही जास्त उंचीच्या मूर्ती कारखान्यात पडून आहेत. तर काहींनी त्या स्वतःहून समुद्रामध्ये विसर्जीत केल्या आहेत. मोठे आर्थिक नुकसान आणि गणेश मूर्ति व्यावसायिक आणि कारखानदार यांच्यातील संभ्रम टाळण्यासाठी राज्य शासनाने मूर्तिकारांचा विचार करून गणेश उत्सव सणाबाबत नियमावली असेल ती लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी मूर्तीकारांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा-पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेचा दणका

ABOUT THE AUTHOR

...view details