पेण (रायगड) : पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मनेषकुमार खोलवडीकर यांना पेण पोलिसांच्या समोरच रुग्णाकडून मारहाण करण्याची घटना शनिवारी सकाळी घडली. डॉ. मनेषकुमार खोलवडीकर यांना मारहाण करत असताना व नर्स तसेच सुरक्षा रक्षक यांना सदर रुग्ण राजू पाटील याने अर्वाच्च व अरेरावीची भाषा वापरली. दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या दहा ते बारा पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. पोलिसांच्या समोर ही घटना घडल्यानं पेण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. दरम्यान, रात्री उशिरा राजू पाटील विरोधात पेण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
रूग्णाने केली डॉक्टरांना मारहाण : मिळालेल्या माहितीनुसार, वरेडी, ता.पेण येथील राजू गोपाळ पाटील ( वय 37) या तरुणाचा तांबडशेत गावातील विहिरी जवळील रस्त्यावर पहाटे मोटारसायकल घसरून अपघात झाला. या अपघातात राजू पाटील याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या डोळ्यावर डॉ. खोलवडीकर हे प्राथमिक उपचार करण्याच्या तयारीत असताना आरोपी राजू पाटील याने हल्ला केला. खोलवडीकरांना लाथा बुक्क्याने मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.