महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबईसह पनवेलमधील तरुण पुढे सरसावले

संकल्प प्रतिष्ठानातील तरुण नवी मुंबई आणि पनवेलमधील सर्व नागरिकांना मदतीचे आवाहन करत पूरग्रस्तांसाठी ब्लॅंकेट, कपडे, कोरडा खाऊ, औषध, लहान मुलांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य जमा करत आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई आणि पनवेलमधील तरुण पूढे सरसावले

By

Published : Aug 11, 2019, 8:17 AM IST

रायगड- भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले...’ या कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ तल्या ओळींनाही बघवली जाणार नाही, अशी अवस्था सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. अन्न, पाणी तसेच कपड्यांसह रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंसाठी शेकडो लोक मदत केंद्रांसमोर रांगेत उभे आहेत. अशावेळेस या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई आणि पनवेलमधील तरुण धावून आले आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई आणि पनवेलमधील तरुण पुढे सरसावले

ज्या पश्चिम महाराष्ट्राकडून सहकार चळवळ शिकायला मिळाली, आज त्याच पश्चिम महाराष्ट्रातील लोक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. महापुराचे संकट दिवसेंदिवस अक्राळविक्राळ बनत असताना सरकारी यंत्रणेच्या मर्यादा ठळकपणे समोर येत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांचा आक्रोश आणि संताप वाढत आहे. घरात घुसलेल्या संकटाशी लोक आपापल्या परीने सामना करत आहेत. पूरग्रस्तांना मदत करायला अनेक हात उभे झाले आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील संकल्प प्रतिष्ठानचे तरुण देखील पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत.

संकल्प प्रतिष्ठानातील तरुण नवी मुंबई आणि पनवेलमधील सर्व नागरिकांना मदतीचे आवाहन करत पूरग्रस्तांसाठी ब्लॅंकेट, कपडे, कोरडा खाऊ, औषध, लहान मुलांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य जमा करत आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन करण्यात आल्यानंतर नवी मुंबई, पनवेलहूनच नव्हे, तर वसई विरार येथून देखील नागरीक स्वतः हून मदतीसाठी संपर्क करत असल्याची प्रतिक्रिया, संकल्प प्रतिष्ठानाचे सूरज वायदंडे यांनी दिली आहे.

पनवेलकरांनी केलेली सर्व मदत एकत्र जमा करून पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर, केवळ लोकांच्या सहकार्यावर अवलंबून न राहता संकल्प प्रतिष्टानच्या सर्व तरुणांनी जमा केलेल्या वर्गणीतूनही आवश्यक साहित्य नवी मुंबईत खरेदी करून ते पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार असल्याचे संकल्प प्रतिष्टानचे निलेश चौधरी यांनी सांगितले.

या कार्यात विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग मिळाला. तसेच शाळा महाविद्यालयांनी देखील कोल्हापूर, सांगलीकरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असल्याचे चित्र नवी मुंबईत पहायला मिळाले, असे संकल्प प्रतिष्ठानच्या तरुणांनी संगीतले आहे. ही मदत मिळवण्यासाठी संकल्प प्रतिष्ठानचे सुरज वायदंडे, निलेश चौधरी, सूर्यकांत सावंत, विनय टिबे, जयेश रेळे, श्रीकांत माने, आतिष सुतार, सुरेंद्र पाटील यांनी मेहनत घेतली. मदत ही एक चळवळ असून ती ‘नागरिकांच्या वतीने नागरिकांसाठी’ राबवलेली आहे, अशी भावना यावेळी संकल्प प्रतिष्ठानच्या तरुणांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details