रायगड- पनवेल नगरपरिषदेचे रुपांतर महानगरपालिकेत होईपर्यंतच्या कालावधीत सफाई कामगार काम करत होते. सिडकोच्या या कंत्राटी सफाई कामगारांचा बोनस हा सिडको देणार की महापालिका या कचाट्यात अडकला होता. परंतु, अनेक पत्रव्यवहार आणि वादाच्या टप्प्यातून गेल्यानंतर अखेर बोनस अडकलेल्या त्या 570 कामगारांचा थकीत बोनस सिडकोच देणार असून त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रतिक्रिया देताना महादेव वाघमारे
पनवेल पालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडकोचा नवीन पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा हा शहरी भाग पनवेल पालिकेत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर काही काळाने घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी १ ऑक्टोबर २०१८ रोजी पनवेल महापालिकेकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारही महापालिकेच्या कंत्राटदाराकडे वर्ग करण्यात आले. नवा कंत्राटदार नेमल्यानंतर एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या कालावधीतील बोनसची रक्कम कामगारांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे ५७० सफाई कामगारांचे बोनस सिडकोकडे थकित होते.
सिडकोच्या आरोग्य विभागाने महापालिकेला बोनसची रक्कम कामगारांच्या खात्यावर देण्यास तयार असून महापालिकेमार्फत त्याचे वाटप करावे, अशी मागणी केली होती. तांत्रिक कारणे दाखवून महापालिकेने ही रक्कम देण्यास नकार दर्शविला.
संबंधित कामगारांच्या खात्यावर सिडकोने थेट रक्कम जमा करावी, असे उत्तर महापालिकेचे सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांनी सिडकोच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर सिडकोने संबंधित सफाई कामगारांच्या खातेक्रमांकाची सविस्तर माहिती महापालिकेकडून मागविली. सिडकोच प्रत्येक कामगारांच्या खात्यावर बोनसची रक्कम देणार असल्याचे निश्चित झाले, मात्र अद्याप महापालिकेने सफाई कामगारांच्या खात्यांची माहिती सिडकोला कळविलेली नाही.
दिवाळीच्यापूर्वी ही माहिती कळविली असती तर सिडकोला बोनस देता आला असता. त्यामुळे लवकरात लवकर महापालिकेने संबंधित ५७० कामगारांच्या बँक खात्यांचा तपशील सिडकोला द्यावा, अशी मागणी आझाद कामगार संघटनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे महापालिकेला आता तरी त्या 570 सफाई कामगारांच्या खात्यांची महिती सिडकोला देण्यासाठी मुहूर्त मिळणार का ? याची प्रतीक्षा इथले सफाई कामगार करत आहेत.