रायगड- बैलगाडी शर्यतींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनारी अधूनमधून बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जाते. 2 दिवसांपूर्वी झालेल्या शर्यतीप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अलिबाग तालुक्याला बैलगाडी शर्यतींची मोठी परंपरा आहे. पूर्वी दरवर्षी ठिकठिकाणी भरघोस बक्षिसांच्या स्पर्धांचे आयोजन केले जात असे. अलिबागमधील महादेव कोळी समाजातर्फे धुलिवंदनानिमित्त दरवर्षी होणाऱ्या स्पर्धा खूप प्रसिद्ध होत्या. या स्पर्धेला मोठी बक्षिसही ठेवली जात. परंतु, 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या शर्यतींवर बंदी घातली. त्यानंतर शर्यतींना परवानगी मिळावी, अशी स्थानिकांचीही मागणी आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे आता गुपचूप या स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि त्यासाठी मोजक्याच गाडीवानांना या स्पर्धेसाठी आमंत्रित केले जाते. याची फारशी कुठे वाच्यता किंवा गवगवा केला जात नाही.