रायगड - सोने, पैसे, चीजवस्तू, ऐवज चोरून नेल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. मात्र, महाडमध्ये चक्क सध्या सोन्याचा भाव आलेल्या कांद्याच्या दोन पोती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने बटाटा व लसणाच्या गोणी असताना फक्त कांद्याच्याच पोती नेल्या आहेत. त्यामुळे कांदा विक्रेत्यांना कांद्यासाठी आता सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.
देशात सध्या कांदा हा सर्व सामान्यांसह श्रीमंतांनाही रडवत आहे. कांद्याचा भाव हा गगनाला भिडला आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. घाऊक बाजारात कांद्याचा भाव 40 ते 45 रुपायांपर्यंत पोहोचले असून किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपये किलो विकला जात आहे. महाडमधील कांदा विकणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांची 2 कांद्याची पोती अज्ञात चोरट्याने चोरून दिवाळी साजरी केली आहे.