रायगड - जिल्ह्यातील उरण नागाव ओएनजीसी प्रकल्पामध्ये गेले काही वर्ष सातत्याने विविध कंत्राटाद्वारे नोकर भरती होत आहे. नागाव म्हातवली येथील प्रकल्पग्रस्त, बेरोजगारांना जाणून बुजून डावलले जात आहे. असा आरोप करत येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५०० एकर जमीन संपादित केली होती. प्रकल्प सुरु होऊन ४० वर्षे उलटली. मात्र आजही या गावातील सुशिक्षित बेरोजगार ओएनजीसीतील नोकरीपासून वंचित आहेत. या बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांच्या महत्वाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेतर्फे उरण तालुक्यातील ओएनजीसी कंपनीच्या गेट समोर उपोषण सुरु केले आहे.
गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही -
स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी नागाव म्हातवली येथील बेरोजगार संघटनेने बेमुदत आंदोलनला सुरूवात केली आहे. या आंदोलनाला पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्षांचा तसेच बेरोजगार युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहायला मिळाला आहे. " नागाव म्हातवलीतील सर्व बेरोजगारांना ओएनजीसी कंपनीत (प्रकल्पात) काम मिळावे, ओएनजीसी कंपनीत, प्रकल्पात नागाव म्हातवलीतील बेरोजगारांना कॉन्ट्रॅक्ट मिळावे. अशी आमची प्रमुख मागणी असून जोपर्यंत याबाबतीत आम्हाला ओएनजीसी कंपनी प्रशासनाकडून लेखीपत्रक मिळत नाही. तोपर्यंत आमचा हा लढा आम्ही असाच पुढे सुरु ठेऊ. नोकरी दिल्या नाही तर थेट गेटमध्ये घुसू. आमच्यावर गोळ्या झाडल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. जर कोणाचे बरे वाईट झाले तर त्या परिणामास सर्वस्वी ओएनजीसी प्रशासनच जबाबदार राहील " असा आक्रमक इशारा नागाव म्हातवली बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू यांनी ओएनजीसी प्रशासनाला दिला आहे.