रायगड-दीव गावातील शासकीय खाजण जमीन घोटाळ्याप्रकरणी मंडळ अधिकारी परशुराम लहाने यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. याआधी नायब तहसीलदार सिराज तुळवे यांच्यावर निलंबनाची कारवाई कोकण आयुक्तांनी केली आहे. शासकीय जमीन घोटाळ्याची व्याप्ती मोठी असताना खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे. मात्र दोषी अधिकाऱ्यांबाबत अद्यापही महसूल यंत्रणेकडून पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे चौकशीचा फार्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.
रोहा तालुक्यातील दीव गावातील खाडीलगत असलेली 342 एकर शासकीय खाजण जमीन दलालांनी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून परस्पर गुंतवणूकदारांना करोडो रुपयाला विकून आर्थिक घोटाळा केला. या प्रकरणात गावातील शेतकऱ्यांनाही फसविण्यात आले. याबाबत सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी आवाज उठविला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कारवाईचे आश्वासन देऊन सिराज तुळवे यांच्यावर निलंबनाची कारवाईचा प्रस्ताव कोकण आयुक्त यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार तुळवे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.