रायगड - मुंबईहून चालत निघालेल्या चाकरमान्याचा पेण तालुक्यातील जिते गावाजवळ वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावर संबंधित प्रकार घडला असून लॉकडाऊनच्या काळातील ही जिल्ह्यातील तिसरी घटना आहे. मोतीराम जाधव (वय-43) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कांदिवली येथून श्रीवर्धनकडे हे कुटूंब स्वत:च्या गावाकडे निघाले होते.
अखेर तो रस्त्यात कोसळला...लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील तिसरी घटना
मुंबईहून चालत निघालेल्या चाकरमान्याचा पेण तालुक्यातील जिते गावाजवळ वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावर संबंधित प्रकार घडला असून लॉकडाऊनच्या काळातील ही जिल्ह्यातील तिसरी घटना आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आणि अन्य नोकरदार वर्गाचा गावी जाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून कामगार चालत किंवा सायकवर गाव गाठण्याचा प्रयत्नात आहेत. रायगड जिल्ह्यात चाकरमानी मुंबईहून रत्नागिरीतील गावी जाण्यासाठी चालत निघाले होते. कांदिवली येथून मोतीराम जाधव यांचे सात जणांचे कुटूंब श्रीवर्धनकडे चालत निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गारील पेण तालुक्यातील जिते गावाजवळ रात्रीच्या वेळी या कुटुंबीयांनी मुक्काम करण्याचे ठरवले. मात्र, याच वेळी मोतीराम जाधव चक्कर येऊन पडले; आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चालत निघालेल्यांचा मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील तिसरी घटना असून माणगाव, विन्हेरे याठिकाणी देखील असेच प्रकार समोर आले होते. मजूरांची गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात कामगारांनी चालत अंतर कापण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या प्रसाराने मृत्यू होण्यापेक्षा त्यांना भूकेने जीव जाण्याची भीती आहे.