रायगड - जिल्ह्यातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णाला तातडीने मुंबईला हलविण्यास सांगितल्यानंतर रस्ते मार्गाने पोहोचण्यास चार ते पाच तासाचा वेळ लागतो. अशा वेळी रुग्ण दगावण्याची शक्यता असते. यासाठी अलिबाग मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावर नौका रुग्णवाहिका (बोट अॅम्ब्युलन्स) सुरू करण्याचा पाठपुरावा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केला होता. राज्य सरकारने मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडीकल युनिटसह नौका रुग्णवाहिका सेवा बाह्य यंत्रणेकडून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय 7 ऑगस्टला काढण्यात आला आहे. जलमार्गे नौका रुग्णवाहिकेमुळे जिल्ह्यातील चिंताजनक रुग्णाला आता मुंबईत वेळेवर पोहोचून जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
अलिबाग मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया अशी जलवाहतूक सेवा प्रवाशांसाठी सुरू आहे. याच जलमार्गावरून चिंताजनक रुग्णांना मुंबईत लवकर उपचार मिळावे यासाठी नौका रुग्णवाहिका सुरू करण्याचा प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून सुरू होता. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार 2019-20 च्या पुरवणी अंमलबजावणी आराखड्यात ही सेवा सुरू करण्याबाबत अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासन निर्णय काढण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील नागरिकांना जलद गतीने मिळणार आरोग्याचा लाभ, नौका रुग्णवाहिकेला परवानगी - रायगड बोट अॅम्ब्युलन्स बातमी
रायगड येथील गंभीर रुग्णांना उपचाराकरीता मुंबईला जाण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागत होता. यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक होती. म्हणून आता अलिबाग मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया,मुंबई पर्यंत नौका रुग्णवाहिकेची सोय करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार घेण्यास मदत होणार आहे.
ही नौका रुग्णवाहिका सेवा प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित केली जाणार आहे. मेडीकल युनिटसाठी लागणारी नौका, यंत्रसामुग्री, औषधे, कर्मचारीवर्ग, इंधन खर्च हे सर्व खर्च नेमण्यात येणाऱ्या बाह्य यंत्रणेकडून करण्यात येतील. काम सुरू झाल्यावर प्रति महिना परिचालन खर्चाचे देयक या बाह्य यंत्रणेस शासनाकडून अदा करण्यात येईल. बाह्य यंत्रणेची सेवा घेण्याबाबतचे दर निविदा प्रक्रियेअंती निश्चित करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक जलद आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी विशेष आभार मानले आहेत.