महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडातील पांढरा कांदा पर्यटकांची पसंती, पण कोरोनामुळे ग्राहकाविना कांद्याचे वांदे

सध्या शेतकऱ्याने पांढरा कांदा हा घरात साठवून ठेवला असला तरी आठवड्याने त्याची जागा सतत बदलावी लागते. अन्यथा हा कांदा खराब होऊ लागतो. साधारण पांढरा कांदा हा तीन ते चार महिने टिकत असला तरी कोरोना संकट कधी जाणार आणि येणाऱ्या पावसाळा हंगामामुळे शेतातून काढलेला पांढरा कांदा पीक कधी विकले जाणार, अशी चिंता आता शेतकऱ्याला लागली आहे. त्यामुळे कोरोनामुळे आता पांढऱ्या कांद्याचे ग्राहकाविना वांदे झाले आहेत.

raigad onion news  raigad latest news  रायगड कांदे न्युज  रायगड लेटेस्ट न्युज
रायगडातील पांढरा कांदा पर्यटकांची पसंती, पण कोरोनामुळे ग्राहकाविना कांद्याचे वांदे

By

Published : Apr 27, 2020, 9:49 AM IST

रायगड - गुणकारी आणि औषधी गुणधर्म असलेला अलिबागचा प्रसिद्ध पांढरा कांदा हा चविष्ट असून त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. दरवर्षी या कांदा पिकातून शेतकऱ्यांची चांगली कमाई होत असते. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूचे संकट आले आणि अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचा वांदा झाला आहे. त्यामुळे कांदा पीक शेतातून काढले असले तरी ग्राहकाविना हा कांदा घरातच साठवून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

रायगडातील पांढरा कांदा पर्यटकांची पसंती, पण कोरोनामुळे ग्राहकाविना कांद्याचे वांदे

अलिबाग तालुक्यात पांढरा कांद्याचे पीक हे खंडाळा, नेहुली या भागात घेतले जाते. दरवर्षी अडीचशे हेक्टर शेतजमिनीत पांढरा कांदा पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जमीन ओलिताखाली राहिल्याने 232 हेक्टर शेतजमिनीत पीक घेण्यात आले. त्यातच, अतिवृष्टीने जमीन ओली राहिल्याने कांदा पिकाला बुरशीजन्य रोगाची लागण झाली. या परिस्थितीवर शेतकऱ्याने मात करून पांढऱ्या कांद्याचे साधारण एक हजार टन पीक काढले आहे.

शेतकऱ्याने कांद्याचे पीक काढले असून ते विकण्यासाठी बाजारात आणण्यास सुरुवात झाली असतानाच कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. संचारबंदी लागू केल्याने जिल्ह्यातील पर्यटन, धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे याठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली. याचा फटका हा यावेळी पांढऱ्या कांद्याला बसला आहे. संचारबंदी असल्याने पर्यटक न आल्याने शेतकऱ्यांना पांढरा कांदा हा घरात साठवून ठेवावा लागला आहे.

पांढरा कांदा हा चविष्ट, गुणकारी असल्याने त्याला प्रचंड मागणी असते. जिल्ह्यात येणारे पर्यटक हे जाताना हा पांढरा कांदा आवर्जून घेऊन जात असतात. पांढऱ्या कांद्याची एक माळ ही साधारण अडीचशे ते तीनशे रुपये दरात मिळते. मात्र, कोरोनामुळे पर्यटकच येत नसल्याने पांढऱ्या कांद्याच्या दरात घट झाली असून शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत माळ मिळत आहे. सध्या शेतकऱ्याने पांढरा कांदा हा घरात साठवून ठेवला असला तरी आठवड्याने त्याची जागा सतत बदलावी लागते. अन्यथा हा कांदा खराब होऊ लागतो. साधारण पांढरा कांदा हा तीन ते चार महिने टिकत असला तरी कोरोना संकट कधी जाणार आणि येणाऱ्या पावसाळा हंगामामुळे शेतातून काढलेला पांढरा कांदा पीक कधी विकले जाणार, अशी चिंता आता शेतकऱ्याला लागली आहे. त्यामुळे कोरोनामुळे आता पांढऱ्या कांद्याचे ग्राहकाविना वांदे झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details