रायगड- निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान झाले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात याचा सर्वाधिक फटका बसला. घरांची मोठी पडझड झाली असून वृक्षही कोसळून पडलेत. तर महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर अनेकांचे संसार उघड्यावर आणणाऱ्या ३ जूनला दुपारी आलेले या चक्रीवादळाने एका वयोवृद्ध भाऊ-बहिणीला बेघर केले आहे. या वादळात वाडवडिलांनी बांधलेले जमीनदोस्त झाले. शासनाकडून घराच्या नुकसानीचे एक लाख साठ हजार रुपयांची मदत देण्यात आली. ती तुटपुंजी ठरली. आता पुन्हा उद्ध्वस्त झालेले जीवनचक्र कसे सुरू करायचे? हा प्रश्न या वृद्धांसमोर उभा ठाकला आहे. या संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा...
अलिबाग तालुक्यातील नागाव सिद्धिविनायक परिसरात जनार्दन पटवर्धन आणि त्याची बहिण लीला हे सव्वाशे वर्षांपूर्वी वाडवडिलांनी बांधलेल्या घरात राहत होते. जनार्दन यांचे वय ८० तर लीला या ७३ वर्षाच्या आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात असलेल्या नारळ, फोफळी, आंबा, फणस यांची छोटी बागायत आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ येणार म्हणून दोघेही बहीण-भाऊ प्रशासनाच्या आदेशानुसार घरातच होते.