रायगड -वाढत्या गॅस आणि इंधनदरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी पिंपळभाट येथील रस्त्याच्याकडेला चूल तयार करून त्यावर तवा ठेवून भाकऱ्या थापल्या. तसेच केंद्र सरकारने पुन्हा चुलीवर जेवण करण्याची ही वेळ आणली असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आला. यादरम्यान, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
'महागाईने जनता हवालदिल' -
देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल शंभरी तर डिझेल नव्वदी पार झाले आहे. घरगुती गॅस सिलेंडरही हजाराच्यावर गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घरातील अर्थकारण बदलले आहे. आधीच कोरोनाने जनता हैराण झाली आहे. त्यातच केंद्र सरकारच्या या धोरणामुळे महागाईचा आलेख चढत चालला आहे. त्यामुळे घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न यावेळी राष्ट्रवादीच्यावतीने विचारण्यात आला.