रायगड - कर्जत खालापूरच्या विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री आदिती तटकरे व राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर टीका केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. राष्ट्रवादीकडून जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेच्या आमदारांचा निषेध केला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
राज्यात महाविकास आघाडीचे सराकार असताना कर्जत-खालापूर मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने नेहमीच कार्यक्रमांवरून धुसफूस सुरू असते. नुकताच कर्जत तालुक्यात एक प्रशासकीय कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना डावलल्यामुळे राष्ट्रवादी अस्वस्थता असताना वाद उफाळून आल्याने शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी माजी आमदारांबद्दल खालच्या पातळीवर टीका केल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवसेनेच्या आमदाराचा निषेध करण्यासाठी खालापूर खोपोली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालीफाटा येथे आज (30 मे) एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.
कर्जत विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादीत बिघाडी
महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आल्याने अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकारणात समज-गैरसमज निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. कर्जत-खालापूरच्या राजकारणातही स्थानिक पातळीवर शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये मतभेत समोर येत आहेत. नुकताच कर्जत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकत्र यावेत यासाठी प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी माजी आमदार सुरेश लाड यांनी आमदार असताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले होते. त्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा नुकताच शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन कार्यक्रम निश्चित केला. हा शासकीय कार्यक्रम असताना माजी आमदार सुरेश लाड किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना बाजूला ठेवून शिवसेनेचीच निशाणी असलेला बॅनर लावून एकतर्फी कार्यक्रम जाहीर केला. आमदार थोरवे यांनी कार्यक्रमात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा -रायगड : पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू