महाड इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखालून 'नाना' अशी हाक मारत माझे नातू धावत येतील, आजोबांची आशा
महाड शहरातील काजळपुरा या परिसरात तारिक गार्डन इमारतीत महंमद अली यांची कन्या नवशीन बांगी ही ए विंगमध्ये आपल्या तीन मुलासह तिसऱ्या मजल्यावर राहत होती. ढिगाऱ्याखालून 'नाना' अशा हाका मारीत माझे नात, नातू धावत येतील, मुलगी आवाज देईल, अशा आशेवर अली हे डोळे लावून बसले आहेत.
रायगड - नात, नातू धावत येऊन नाना म्हणून हाका मारीत धावत येतील, या आशेने आजोबांचे डोळे पडलेल्या तारिक गार्डन इमारतीच्या ढिगाऱ्याकडे लागले आहे. महंमद अली वुकेय यांची ही करुण कहाणी आहे. महंमद अली यांची मुलगी आणि दोन नाती, एक नातू हे तारिक गार्डन इमारती दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेतून चारही जण सुखरूप बाहेर पडावे, अशी भाबडी आशा महंमद अली यांनी धरली आहे.
महाड शहरातील काजळपुरा या परिसरात तारिक गार्डन इमारतीत महंमद अली यांची कन्या नवशीन बांगी ही ए विंगमध्ये आपल्या तीन मुलासह आयशा बांगी (6), महंमद बांगी (4) रुकय्या बांगी (2) तिसऱ्या मजल्यावर राहत होती. सोमवारी 24 ऑगस्टला सायंकाळी सातच्या सुमारास तारिक गार्डन ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. ही माहिती नवशीन बांगी हिच्या भावाला कळल्यावर त्वरित त्याने आपले वडील महंमद अली यांना फोन करून मंडणगड पंदेरी येथून महाडला येण्यास सांगितले.
महंमद अली हे सुद्धा नवशीन बांगी यांच्याकडे राहत होते. मात्र, लॉकडाऊन असल्याने ते मंडणगड पंदेरी येथे आपल्या गावी राहत होते. दुर्घटनेची माहिती कळताच महंमद अली हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचताच समोरचे दृश्य पाहून अली हे थबकले. ढिगाऱ्याखालून 'नाना' अशा हाका मारीत माझे नात, नातू धावत येतील, मुलगी आवाज देईल, अशा आशेवर अली हे डोळे लावून बसले आहेत.