रायगड - जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर नवीन वर्षाच्या स्वागताला पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. काही अतिउत्साही पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या या प्रेक्षणीय स्थळावर मद्यप्राशन करून धिंगाणा घालतात. अशा मद्यपी पर्यटकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिवभक्तांनी दिला आहे. आनंद साजरा करताना रायगडाचे पावित्र्य राखण्याचे आवाहनही शिवभक्तांनी पर्यटकांना केले आहे.
रायगड जिल्ह्यात रायगड, कुलाबा, पद्मदुर्ग, खांदेरी, उंदेरी, सरसगड, सुधागड, तळा गड यासारखे ऐतिहासिक गड आहेत. या गडांवर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, काही वेळा पर्यटक अनुचित प्रकार करतात. अलिबाग समुद्रात असलेल्या खांदेरी किल्ल्यावर काही दिवसापूर्वी दोन गटात मद्यप्राशन करून हाणामारी झाल्याची घटना ताजी आहे. रायगडावरही काही पर्यटक मद्यप्राशन करून किल्यावर आले होते. त्यांना शिवभक्तांनी चोप दिला होता.