रायगड - मुरुड रोहा परिसरात येत असलेल्या फार्मा पार्क प्रकल्पाला येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तर दुसरीकडे केंद्राने अद्यापही प्रकल्पासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. असे असताना हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असून हा प्रकल्प नको असल्याबाबत आज सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी निधी चौधरी याची भेट घेऊन निवेदन दिले आहे. तर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अलिबाग तुषार विश्रामगृह येथे उल्का महाजन यांनी मुरुड रोहा फार्मा पार्क प्रकल्पाबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
फार्मा पार्कला विरोध तरीही लादण्याचा प्रयत्नमुरुड रोहा तालुक्यातील १७ गावामध्ये ४९०० एकर जमीन फार्मा प्रकल्पासाठी भूसंपादीत होणार आहे. यामुळे शेतकऱ्याच्या सुपीक जमिनी नष्ट होणार आहेत. मच्छीमार बांधव हासुद्धा या प्रकल्पामुळे देशोधडीला लागणार आहे. शेतकऱ्यांना हा प्रकल्प नको आहे असे असतानाही प्रशासनाकडून शेतकऱ्यांना नोटीशी पाठविण्यात आल्या आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदविल्या असूनही प्रशासन जबरदस्ती हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप उल्का महाजन यांनी केला आहे.
प्रकल्पाला केंद्राची मंजुरीच नाहीरायगड जिल्ह्यात मुरुड रोहा तालुक्यातील १७ गावात फार्मा पार्क प्रकल्प येत असल्याचे बोलले जात आहे. तशी पावले प्रशासनाकडून उचलली जात आहेत. याबाबत केंद्राकडे माहितीच्या अधिकारात प्रकल्पाला मंजुरी दिली आहे का अशी माहिती मागितली होती. मात्र, या प्रकल्पाला केंद्राने कोणतीही मंजुरी दिलेली नाही आणि तत्वतः मान्यताही दिलेली नाही, असे पत्र केंद्राने दिले आहे. मग शेतकऱ्याच्या जमिनी कशासाठी भूसंपादीत केल्या जात आहेत? असा प्रश्न उल्का महाजन यांनी उपस्थित केला आहे.
सत्ताधारी आणि विरोधक यांची दुट्टपी भूमिकाकोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, अशी घोषणा खासदार सुनील तटकरे यांनी राज्याचे मंत्री असताना केली होती. मात्र, तटकरे यांनी हा प्रकल्प व्हावा यासाठी केंद्राकडे पत्र व्यवहार केला आहे. त्यावेळी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने २०१३ चा कायदा रद्द केला आणि हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला. आता ते विरोधात असून या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक याची याबाबत दुट्टपी भूमिका असल्याचे दिसत आहे. असे उल्का महाजन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.