रायगड (अलिबाग)- परदेशातून येणाऱ्या पर्यटचकांनमुळे कोरोनामुळे धोका वाढत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत संचारबंदी लागू केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी माहिती दिली आहे. तसेच कोरोनाच्या नियमाचे पालन न करणाऱ्या हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊसवर कारवाई केली जाणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकांना सात दिवसांसाठी बंदी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे. मुरुड जंजिरा किल्लाही 25 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यत पर्यटकांसाठी बंद केल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत जिल्ह्यात संचारबंदी
ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये काहीजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. रायगड जिल्ह्यातही नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकही येऊ लागले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार रायगडातही रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत संचारबंदी लागू केली जाणार आहे.
समुद्र किनारी पर्यटकांची गर्दी
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने पर्यटनाला परवानगी दिली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन याठिकाणच्या समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे पर्यटन वाढत असले तरी दुसरीकडे कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार अजून डोक्यावर लटकलेली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातही रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यत संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.