रायगड : न्हावा शेवा बंदरातून मुंबई सीमा शुल्क विभागाने दुबईहून देशात तस्करी केली जात असलेल्या विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे. तस्करांनी सीमा शुल्क अधिकाऱ्यांना कळू नये म्हणून सिगारेट कंटेनरमधील सामानात लपवून आणल्या होत्या.
अल्युमिनियन कचऱ्यात लपवून तस्करी
ॲल्युमिनियम कचरा आणि वाहनांच्या स्पेअरपार्टमध्ये सिगारेट लपवून ठेवण्यात आल्या होत्या. तस्करीतून आलेल्या सिगारेटची किंमत १४ कोटी रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केली नाही. सहा महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे नाव्हा शेवा बंदर हे पुन्हा तस्करचा अड्डा बनत चालला असल्याचे दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशातील टोळीमार्फत तस्करी
उत्तर प्रदेशमधील माफिया टोळीमार्फत दुबईहून भारतात परदेशी सिगारेटची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. विश्वसनीय खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर न्हावा-शेवा बंदरात दुबईहून आलेल्या जहाजातील संशयित कंटेनर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. कंटेनरची कसून तपासणी केली असता विदेशी सिगारेट लपविण्याच्या तस्करांच्या युक्तीने अधिकारीही अवाक झाले.
दुबईहून आले होते जहाज
दुबईहून आलेल्या जहाजातील संशयित कंटेनरमधून अल्यूमिनियम भंगार आणि इंजिनचे स्पेअर पार्ट आणले होते. या भंगारात आणि स्पेअर पार्टच्या भागावर विदेशी सिगारेट युक्तीने लपविले होते. सीमाशुल्क अधिनियम १६२ च्या तरतुदीनुसार सिगारेटचा साठा अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क सुत्रांनी दिली आहे.
सहा महिन्यात तिसरी घटना
न्हावा शेवा बंदरातून मागील सहा महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी दुबईतून आयात करण्यात आलेला १२ कोटी किंमतीच्या सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता. या घटनेमुळे न्हावा शेवा बंदर हे तस्करांचा अड्डा होऊ लागला आहे.