रायगड - गाव पाड्यात विजेचा खांब, तुटलेल्या विजेच्या तारा, डीपी बदलायचा असेल किंवा विजेबाबत काही समस्या असतील तर ग्राहकाला आणि ग्रामस्थांना हजार चकरा महावितरण कार्यालयात माराव्या लागतात. मात्र कामे होत नाहीत. मात्र आता ही समस्या महावितरण विभागाने सोडवली आहे. महावितरण अधिकारी कर्मचारी हेच आता गावागावात येऊन समस्या सोडवू लागले आहेत. 'एक गाव एक दिवस' या अभियान अंतर्गत महावितरणच आता गावात येऊन समस्या सोडवू लागले आहेत. त्यामुळे रायगडकरांना आता महावितरण कार्यालयाचे उबरडे झिजवावे लागणार नसल्याचा सुखद धक्का बसला आहे.
एक गाव एक दिवस अभियान जिल्ह्यात सुरू
जिल्ह्यात एक गाव एक दिवस हे अभियान रायगड जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे हे अभियान राबविण्यात आले आहे. महावितरण आणि ग्राहक यांच्यात स्नेहाचे संबंध दृढ होऊन गावातील विजेच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी हे अभियान राज्यासह जिल्ह्यात सुरू करण्यात आले असल्याचे भांडुप परिमंडळचे मुख्य कार्यकारी अभियंता सुरेश गणेशकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. रायगड अधीक्षक अभियंता दीपक पाटील, अलिबाग कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, सहायक अभियंता मोतीराम रघ, सहायक अभियंता सादिक इनामदार, विकास जगताप, वाडगाव ग्रामपंचायत सरपंच सरिता भगत, उपसरपंच प्रसाद पाटील, सदस्य जयेंद्र भगत, ग्रामस्थ, महावितरण कर्मचारी अभियानात सहभागी झाले होते.