पेण (रायगड) -खासदार झाल्यामुळे संसदेच्या अधिवेशनात सहकारी बँका बाबत विधेयक मांडण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी सहकारी बँक विलनिकरण बाबतीत जशी केंद्र सरकारने भूमिका घेतली, तशीच भूमिका पेण अर्बन बँक व इतर बुडालेल्या सहकारी बँकांबाबत घेतली पाहिजे. अशी भूमिका ही मी मांडली. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींची यांची भेट घेऊन प्रयत्न सुरू केले. करोना झाल्याने मधल्या काळात याबाबत माहिती घेऊ शकलो नाही. परंतु आत्ता राष्टवादीचा खासदार म्हणून नाही तर निखळ लोकप्रतिनिधी म्हणून हा विषय सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. जिल्ह्याचे दायित्व म्हणून हा विषय संपेपर्यंत लढा निश्चितच पूर्ण करणार, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथे ठेवीदार-खातेदार यांना मार्गदर्शन करताना दिला.
पेण अर्बन बँकेविषयी सुनील तटकरे यांनी संसदेत विषय मांडला होता. मात्र, या विषयाचा पाठपुरावा करावा यासाठी अर्बन बँक ठेवीदार खातेदार यांनी खासदार सुनील तटकरे यांना रविवारी (दि. 20 डिसें.) निवेदन दिले.