रायगड - अलिबागची शान असलेल्या कुलाबा किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊन भावी पिढीला किल्ल्याचा इतिहास कळावा, या दृष्टीने राज्य शासन आणि केंद्रामार्फत पावले उचलली जात आहेत, असे राज्य पर्यटनमंत्री, पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.
कुलाबा किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार कुलाबा किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार - पालकमंत्री कुलाबा किल्ल्याच्या पडझडीबाबत मावळा प्रतिष्ठानने खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांना निवेदन दिले होते. त्यानुसार, आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त गडाची स्वच्छता आणि पाहणी करण्यासाठी पालकमंत्री आणि खासदार यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी एक असलेला अलिबागचा कुलाबा किल्ला. कान्होजी आंग्रे यांच्या अखत्यारित असलेला हा कुलाबा किल्ला. सध्या या किल्याच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली असून अस्वच्छता पसरली आहे. पुरातत्व विभागही याकडे दुर्लक्ष करत आहेत. मावळा प्रतिष्ठानतर्फे किल्ल्याची स्वच्छता केली जात असून संरक्षक भिंतीची झालेल्या पडझडीबाबत पालकमंत्री आणि खासदारांना माहिती दिली होती. त्यानुसार खासदार सुनील तटकरे यांनी पाहणी केली होती. आज पालकमंत्री, खासदार,जिल्हाधिकारी, पुरातत्व अधिकाऱ्यांनी किल्ल्याची पाहणी केली. हेही वाचा -विदर्भातील 'या' भाजपा आमदाराने घेतला वरळीत 42.5 कोटींचा फ्लॅट
कुलाबा किल्याच्या पडझडीबाबत 46 लाखाचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. कामाची निविदा लवकरच निघणार असून नोव्हेंबरपर्यंत कामाला सुरुवात केली जाणार आहे. पुरातत्व अधिकारी यांच्यात समन्वय साधून किल्ल्याची डागडुजी केली जाणार आहे. किल्ल्यात होणाऱ्या माघी गणेशोत्सव जयंतीबाबतही पुरातत्व अधिकाऱ्यांशी बोलणी झाली आहेत. तसेच, कुलाबा किल्ल्याचा इतिहास येणाऱ्या पर्यटकांना कळावा यासाठी स्थानिक गाईड नेमले जाणार आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून पुन्हा किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे, असे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
किल्ल्यातील स्वच्छतागृह, पाणी समस्याही सोडविण्यात येणार आहे. कुलाबा किल्ल्यातील ऐतिहासिक असलेल्या तोफा तसेच इतर पुरातन वस्तूंचे जतन करून पर्यटकांसाठी पाहण्यासाठी एका दालनात ठेवले जाणार आहे. किल्ल्याचा इतिहास हा भावी पिढीला कळावा, यादृष्टीने कुलब्याला पुन्हा गतवैभव मिळवून देणारा आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा -कोल्हापूर : खासगी हॉस्पिटल लूट करत असतील तर, तक्रार करा - सतेज पाटील