रायगड - महाराष्ट्र नवनिर्माण सेना खोपोली शहर यांच्या वतीने जागतिक मराठी भाषा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी मराठी भाषेचा विकास आणि प्रसारास चालना मिळावी या दृष्टिकोनातून 'मी मराठी-माझी स्वाक्षरी मराठी' या अभियानाचे आयोजन मनसे शहर अध्यक्ष अनिल मिंडे यांनी केले होते.
अनेकांनी फलकावर केल्या सह्या-
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल, असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.