रायगड - राज्य सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पेणच्या उपविभागिय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी वीजबिल दरवाढी विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरातील नागरिकांना वाढीव लाईटबील आल्याने सर्वत्र असंतोष आहे. त्यातच सरकारने हे बील भरण्याची सक्ती केल्याने विरोधकांनी याविरोधात मोर्चे काढले. मनसेने देखील अल्टिमेटम देत वीज बिलं माफ करण्याची मागणी केली होती. यासाठी आज राज्यभरात मनसे रस्त्यावर उतरली होती.
वीजबिल दरवाढी विरोधात मनसे आक्रमक; पेणमध्ये मोर्चा - MNS protested in raigad
राज्य सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पेणच्या उपविभागिय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
कोरोना काळात सामान्य जनतेचा रोजगार बुडाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असतानाच राज्यसरकारने वाढीव विजबिल आकारुन सामान्य जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप मनसेने केला. वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागिय अधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मनसे व्यापारी सेना राज्य उपाध्यक्ष संदीप ठाकूर, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव रुपेश पाटील, अंकुश म्हात्रे, अमोल म्हात्रे, नितिन पाटील, सुनिल साठे, नागेश गांवड, सपना देशमुख, आदींसह मनसेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.