रायगड- मुंबई, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चाकरमानी कोकणाच्या वाटेला लागले आहेत. मात्र, असे असले तरी रायगडच्या वेशीवर असलेल्या कशेडी घाटात, येणाऱ्या चाकरमानी प्रवाशांची तपासणी, कागदपत्रे पाहूनच रत्नागिरी प्रशासन या प्रवाशांना जिल्ह्यात घेत आहेत. रत्नागिरीकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि प्रशासनावर वाढत असलेल्या ताणामुळे हा निर्णय रत्नागिरी प्रशासनाने घेतला आहे.
मात्र, यामुळे कशेडी घाटात असलेल्या बंगला या तपासणी नाक्यावर प्रवाशांना भर उन्हात तासन् तास रखडत राहावे लागत असल्याने, वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या रोज पाहायला मिळत आहे. तर सुरक्षित अंतराचाही यामुळे फज्जा उडालेला दिसत आहे. वाहन आणि प्रवाशांच्या गर्दीमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर आंतरजिल्हा बंदीही प्रशासनाने लागू केली. शासनाने परराज्यात, राज्यात, जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे परराज्यातील तसेच जिल्ह्या-जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी धडपड सुरू केली. रायगडसह कोकणातील लाखो चाकरमानी मुंबई, पुणे शहरात कामधंद्यासाठी स्थायिक झाले आहेत. पण, मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चाकरमानी आपला गाव बरा, म्हणत गावी येऊ लागले आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमानी मुंबई, पुणे येथून येण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधित संख्येमुळे सुरक्षेच्या दृष्टीने या चाकरमानी प्रवाशांना कशेडी घाटातील बंगला चेकपोस्टवर थांबविले जाते. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाकडून या प्रवाशांची कागदपत्रे, पास तपासणी करून थर्मल टेस्टिंगही केली जात आहे. ज्यांच्याकडे पास नाहीत, त्यांना पुन्हा माघारी फिरवले जात आहे. मात्र, ही तपासणी सुरू असल्याने वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. शिवाय तपासणीमुळे प्रवाशांना भर उन्हात आपल्या बच्चे कंपनीला घेऊन ताटकळत उभे राहावे लागत आहे. मात्र, हे करताना सुरक्षित अंतराचा फज्जा उडत आहे. वाढत असलेल्या गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त असला तरी गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे.