रायगड -इर्शाळवाडीत भूस्खलन झाल्याने आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडीत शुक्रवारीही एनडीआरएफकडून बचावकार्य सुरुच आहे. बचावकार्यादरम्यान आणखी दोन महिलांचे आणि इतर तीन असे एकूण पाच मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढतच आहे. बुधवारी रात्री इर्शाळवाडीत भूस्खलनाची घटना घडली होती.
मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी - घटना घडल्यानंतर लगेच घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. त्यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. गुरुवारी रात्री अंधार आणि पावासामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
माती हटवण्याचे काम सुरू - बुधवारी सकाळपासून मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू होते. परंतु, अंधार आणि पावसामुळे हे काम थांबवण्यात आले होते. जवळपास 15 ते 20 फूट मातीचा मलबा साचला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांसोबत स्थानिक नागरिकही मातीचा ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत. या भागात सध्या सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगरावरील माती पुन्हा खाली येत आहे. इर्शाळवाडीत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे मलबा बाजुला करण्याचे काम करण्यासाठी मोठे उपकरणे एनडीआरएफ आणि अग्निशमक दलाला नेता आले नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी बचावकार्यात येत आहेत.
अनेक घरे जमीनदोस्त - खालापूर तालुक्यांतर्गत डोंगर उतारावर वसलेल्या इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भूस्खलन झाले. गावातील सुमारे 50 घरांपैकी 17 घरे जमीनदोस्त झाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या डोंगरभागात मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे इर्शाळवाडीमध्ये भूस्खलनाची घटना घडली.
हेही वाचा -
- Raigad Landslide: इर्शाळवाडीत बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या चार टीम दाखल; आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू
- Irshalwadi Landslide : रात्रीच्या अंधारात इर्शाळवाडीवर झाला घात; माळीणच्या घटनेची झाली आठवण
- Irshalwadi landslide Incident : इर्शाळवाडीत घडलेली घटना दुर्दैवी, मंत्री दीपक केसरकर