रायगड - जन्मोजन्मी हाच पती मिळावा, पती-पत्नीचे नाते अखंड राहावे, अशी प्रार्थना करत पनवेलमधील महिलांनी पारंपारिक पध्दतीने उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणण्यापेक्षा प्रत्यक्ष वडाच्या झाडाच्या ठिकाणी जाऊनच वटपौर्णिमा साजरी करण्याला यावेळी महिलांनी पसंती दिली आहे.
वटपौर्णिमेनिमीत्त वडाला धागा बांधून पूजा करतांना सुवासिनी
वटपौर्णिमेचा हा दिवस आजच्या आधुनिक युगातही तितक्याच पारंपारिक पध्दतीने साजरा केला जातो. जन्मोजन्मी हाच पती मिळावा याचबरोबर वृक्षपूजा हासुध्दा वटपौर्णिमेचा हेतू आहे. आपल्या पातिव्रत्याने सत्यवानाचे प्राण परत मिळविण्यासाठी सावित्रीने यमाला भाग पाडले अशी अख्यायिका या सणाबद्दल सांगितली जाते.
रविवारी दुपारी साडेबारानंतर पौर्णिमा सुरु होत असल्याने पनवेलमध्ये दुपारनंतरच पूजेसाठी महिलांनी गर्दी केली होती. वडाच्या झाडाला महिलांनी धाग्याचे सात फेर बांधत तिथे उपस्थित असणाऱ्यांना वाण दिले. हिरव्या बांगड्या, हळकुंड, सुपारी, बदाम यासह आंबा वाहून ही पूजा करण्यात आली. जुन्या पिढीतील महिलांबरोबरच नवीन पिढीतील महिलाही उत्साहाने ही वडाची पूजा करताना ठिकठिकाणी दिसून येत होत्या. पूजा ककेल्यानंतर महिलांना नंतर मात्र सेल्फीचा मोह आवरला नाही. असे नटून थटून जवळपास असणाऱ्या वटवृक्षाची पूजा केली. यावर्षी पावसाचा व्यत्यय नसल्याने स्त्रियांच्या उत्साहाला उधाण आले होते.
एकविसाव्या शतकात वावरत असलेल्या आजी, सासु, यांच्या समवेत नव्या पिढीतील सुवासिनींबरोबरच नववविवाहितांनी देखील वटपौर्णिमेचे व्रत मनोभावे केले. सात जन्म याच सख्याची साथ लाभू दे म्हणून वयाने, मानाने मोठ्या असलेल्या सुवासिनींच्या पाया पडत आशीर्वाद उखाणे देखील घेतले. शहरातील ठिकठिकाणी असणाऱ्या वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी आज सकाळपासून महिलांनी गर्दी केली होती.