रायगड - मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्याकडून येत्या 9 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा रद्द कराव्यात, पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी, राज्य शासनाने त्याच्या कोट्यातून मराठा समाजाला 12 टक्के जागा द्याव्यात आणि आरक्षणासाठी राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात तत्काळ प्रयत्न करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांनी दिली.
मराठा आरक्षण : रायगडमध्ये 9 ऑक्टोबरला ठिय्या आंदोलन - maratha reservation demands raigad
रायगडमध्ये येत्या 9 ऑक्टोबरला विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत आज (अलिबाग) येथे समाज प्रतिनधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
9 ऑक्टोबरला होणाऱ्या या आंदोलनाबाबत आज (सोमवारी) अलिबाग येथे दिशा आणि मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील गुरुप्रसाद हॉटेल येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, जिल्हा समन्वयक गणेश कडू, जिल्हा समन्वयक राजेश लाड, जिल्हा समन्वयक सोमनाथ ठोंबरे, अलिबाग तालुका सकल मराठा समाज अध्यक्ष नरेश सावंत, सचिव उल्हास पवार, सहसचिव अनिल गोळे, कृष्णा जाधव, खजिनदार संतोष पवार, प्रसाद गायकवाड, सल्लागार बाळू पवार, नयन जरंडे आदी उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्षस्थावरून मराठा क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे, रघुजी आंग्रे, नरेश सावंत आदींनी मार्गदर्शन केले.
आरक्षणासाठी 2018मध्ये महाराष्ट्रभर क्रांतीदिनी झालेल्या आंदोलनानंतर तत्कालीन सरकारला आरक्षणावर शिक्कामोर्तब करावे लागले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला नुकतीच तात्पुरती स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारने पोलीस भरतीची घोषणा करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. ही भावना सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी संतापलेल्या मराठा समाजाकडून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर २५ सप्टेंबरला ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. आता अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती विनोद साबळे यांनी दिली.