नाशिक - मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. यामुळे सरकारला मागण्या सोडवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येत असून पुढील एक महिना मूक आंदोलन पुढे ढकलले असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले. मात्र, या काळात मराठा समन्वय यांच्या बैठका सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा समाज आरक्षण रद्द झाल्याने आम्ही दु:खी झालो आहोत. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर ताशेरे ओढायला सुरुवात केली. त्यामुळे मी अस्वस्थ होतो. त्यांच्या भांडणात समाजाला काहीच मिळाले नव्हते. ही समाजाची भावना होती. समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतली, म्हणून मूक आंदोलनाचे नियोजन करण्यात आल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या ठिकाणी बोलावण्यात आले होते. पाच मूक आंदोलन जाहीर केले आहेत. त्यातील कोल्हापूर आणि नाशिक येथे दोन आंदोलन झाली आहेत. या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. कोल्हापूर आंदोलननंतर सरकारकडून चर्चेसाठी आमंत्रण आले. यावेळी सकारात्मक चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -टाकाऊ वस्तूंपासून बनवली सुंदर बाग; कोरोनाकाळात दोन बहिणींचा उपक्रम
उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन -
गुरुवारी राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सरकार मागासआयोग स्थापन करण्याची तयारी करत आहेत. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सात मागण्यांवर चर्चा झाली. सारथीला आठ विभागीय कार्यालये, कोल्हापूर उपकेंद्राला सरकारने मंजुरी दिली. सोलापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीन ठिकाणी जमिनीची पाहणी केली. 26 जूनला जागा निश्चित होईल. सारथीला स्वायत्तता देण्यासाठी 36 जिल्ह्यातील 23 जिल्ह्यात वसतीगृह यादी तयार करण्यात आली आहे. 21 दिवसात सारथीला मोठी रक्कम जाहीर करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला दिले आहे, असेही संभाजीराजेंनी सांगितले.
हेही वाचा -नागपूर हादरले!!! पत्नी, मुलगा, मुलगी, सासू आणि मेहुणीला भोसकून आलोक माटूरकरने घेतला गळफास
अण्णासाहेब पाटील आर्थिक मंडळ येथील जाचक अटी शिथिल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणात मिळणाऱ्या सवलती मराठा विद्यार्थ्यांनादेखील मिळणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच आरक्षणाला अधीन पात्र नोकऱ्या, विशेष बाब म्हणून नियुक्ती द्या, या सरकारकडे मागण्या आहेत. या सर्व मागण्यांसाठी सरकारला आम्ही 21 दिवस देत आहोत. पुढील 21 दिवसांसाठी मुक आंदोलन पुढे ढकलले असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.