रायगड - वेळेत उपचार मिळाल्याने आणि 108 रुग्णवाहिकेची साथ न मिळाल्याने एका अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 20 जून) रोजी रात्रीच्या सुमारास माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घडली.
रायगड : वेळेवर उपचार अन रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमी व्यक्तीचा मृत्यू
एक अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर वेळेवर उपचार नाही मिळाले व दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
रामजी काळू वाघमारे (वय 30 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. माणगाव पोलीस ठाण्यात अपघाताबाबतची नोंद करण्यात आली आहे. डॉक्टर आणि 108 रुग्णवाहिकेच्या निष्काळजीपणामुळे वाघमारे कुटुंबाला आपल्या तरुण मुलाला गमवावे लागले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
माणगाव तालुक्यातील विळे या रस्त्यावर 20 जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात रामजी वाघमारे हा जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते निलेश वांजळे यांनी रामजी याला आपल्या वाहनातून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉ. डोईफोडे आणि डॉ. जोशी यांनी रामजी याच्यावर तात्पुरते उपचार करून अलिबाग येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, वाघमारे याची घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे निलेश वांजळे यांनी डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी सायंकाळी सहा वाजता 108 रुग्णवाहिका बोलावली, असे सांगितले.
रुग्णवाहिका येईपर्यंत रामजी याला रुग्णालयातील वार्डमध्ये ठेवणे गरजेचे होते. मात्र, रामजी याला बाहेरच स्ट्रेचरवर ठेवले होते. त्याच्या डोक्यातून रक्तश्राव ही मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र, डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. 108 रुग्णवाहिकाही आली नसल्याने रामजी याची तब्येत खालावू लागली होती. अखेर सहा तासानंतर रुग्णवाहिका आली आणि त्यानंतर रामजी यास अलिबाग येथे घेऊन निघाली. मात्र, वाटेतच रामजी याने प्राण सोडला होता.
डॉक्टरांचे उपचार वेळेत मिळाले असते आणि 108 रुग्णवाहिका वेळेत आली असती तर रामजीचे प्राण वाचले असते. मात्र, डॉक्टर आणि 108 च्या निष्काळजी पणामुळे रामजीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, असी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश वांजळे यांनी केली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना विचारणी केली असता घटनेची माहिती घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा -'निसर्ग'चा परिणाम : नारळसह सुपारी खाणार भाव, शेतकरी मात्र अडकित्यात