खालापूर (रायगड) - तालुक्यातील कलोते गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने या काही अंतराच्या मार्गावरून प्रवास करणे जिकरीचे बनल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून दिली जात आहे. हा मार्ग वर्दळीचा असून परिसरातील दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व अन्य वाहनांची वाहतूक सुरू असल्याने खड्डेमय मार्गावर प्रवास करणे मोठे कसरतीचे झाल्याचे नागरिक म्हणत आहेत. त्यामुळे याची प्रशासनाने दखल घेत रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
कलोते गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण खड्ड्यामुळे नागरिकांना होतोय त्रास -
तालुक्यातील बहुतेक रस्त्यांना जणू ग्रहणंच लागले की, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या तातडीने दुरूस्तीची मागणी होत आहे.
पहिल्याच पावसात रस्त्यावर डबक्याचे स्वरूप
कलोते गावाच्या परिसरातील विद्यार्थ्यांना तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांत जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचेही हे संपर्काचे मुख्य माध्यम आहे. खड्डेमय रस्ता असल्याने पहिल्याच पावसात रस्त्याला डबक्याचे स्वरुप आल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे लवकर हा रस्ता खड्डे मुक्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया -
कलोते गाव हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून गावात दररोज गावकरी व अन्य नागरिकांची ये-जा असतेच. गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची खड्डेमय अवस्था झाल्याने काही अंतरापर्यत प्रवास करणे अवघड बनत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत हा मार्ग खड्डेमुक्त बनवावा, जेणेकरून सर्वाचा प्रवास सुखाचा बनेल असे नागरिक म्हणत आहेत.