रायगड- मी वारकरी सांप्रदायाचा वारसा असणाऱ्या कुटुंबातील एक तरुण असून माझ्यावर टाकलेले सर्व गुन्हे हे राजकीय दबावापोटी असून सफेद कपडे व गांधीटोपी घालून कलेक्टरच्या कानफटीत मारणारे खरे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, असे सडेतोड उत्तर आपल्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी दिले आहे. कोणी नेता पक्ष सोडून गेला असेल पण शिवसैनिक जागेवरच आहेत. ते त्यांना जागा दाखवतील, असा टोला ही त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला.
ईटीव्ही भारतशी बोलताना कर्जत विधानसभेचे युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की, प्रचारात खूप उत्साही वातावरण असून गेली 10-15 वर्षे विरोधी पक्षाचा आमदार असताना मतदार संघातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत गरजा अजूनही अपूर्ण आहेत. पाण्याचा भीषण प्रश्न प्रलंबित असल्याने जनता आता रस्त्यावर प्रचारात उत्तराली आहे व विकासासाठी महायुतीच्या बरोबर आहे.
हेही वाचा - पवारसाहेबांचे सर्व दात पडले असून; आता फक्त सुळेच शिल्लक, गीतेंची बोचरी टीका
मी शिवसेनेचे काम करीत असल्याने विरोधी पक्षाकडून राजकीय दबाव आणण्यात येत होता. याच कारणाने आपल्यावर मागील काळात गुन्हे दाखल झाले, असे थोरवे यांनी म्हटले आहे. जाणून-बुजून खटले नोंदविण्यात आले, असे ते म्हणाले. सफेद कपडे आणि गांधी टोपी घालून जिल्हाधिकाऱ्याच्या कानफटीत मारणारे खरे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोण आहेत, हे जनतेला माहीत आहे, असा खुलासावजा आरोप नाव न घेता त्यांनी केला.