रायगड - राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. काल (गुरुवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ६ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर सर्वत्र जल्लोष करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर पेणमध्ये महाआघाडीतील तीनही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, विजयाच्या घोषणा देऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे, लाडू भरवून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याचा आनंद साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकल, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, चेतन मोकल, प्रकाश मोकल, कांतीलाल म्हात्रे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा पेणमध्ये जल्लोष भाजपच्या माध्यमातून राष्ट्रपती राजवट लादण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, तो प्रयत्न महाआघाडीने हाणून पडला. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्राला झेपली नसती, महत्वाचे निर्णय घेता आले नसते. मात्र, महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याला पुन्हा सुगीचे दिवस आले असल्याचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकल म्हणाले.
ज्यांनी मतपेटीत मतदान करून महाविकास आघाडीला कौल दिला आहे त्या गोरगरीब जनतेनेच खऱ्या अर्थाने हा बदल घडवून आणला आहे. भाजप एकहाती सत्ता घेण्याची वार्ता करीत होती. त्यांना जेमतेम शंभरचा आकडा गाठता आल्याचे शिवसेना तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण झाल्याचे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड किल्ल्यावरील संवर्धनासाठी 20 कोटी रुपये मंजूर केल्याने जिल्ह्यातील महत्व अधिक वाढणार असल्याचे भगत म्हणाले.