पनवेल -पडघे-तळोजा एमआयडीसीमध्ये सुरू झालेल्या अमूल पंचामृत दूध डेअरी विरोधात मनसेने मोर्चा काढला. नव्यानेच सुरू झालेल्या या अमूल पंचामृत दूध डेअरी कंपनीत स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना नोकऱ्या देण्यात आल्याचा आरोप यावेळी मनसैनिकांनी केला आहे.
पनवेल तालुक्यातील पडघे येथील भूमीपुत्रांच्या न्याय-हक्कासाठी महाराष्ट्र निवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पडघे या गावामध्ये अमूल दूध पंचामृत डेअरीचा प्रकल्प सुरू झाला आहे. मात्र, याठिकाणी परप्रांतीय कामगारांची भरती मोठ्या प्रमाणावर केली आहे. याठिकाणी स्थानिक भूमीपुत्रांना डावलण्याचा प्रकार सातत्याने होत आहे. याबाबत मनसेने आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक भूमीपुत्रांना डेअरीच्या प्लांटमध्ये ८० टक्के नोकऱ्या उपलब्ध करून न दिल्यास शेकडो कार्यकर्त्यांसह कंपनीवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी दिला होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या मागणीनुसार व्यवस्थापनाने दाद न दिल्यामुळे ठरल्याप्रमाणे मोर्चा काढण्यात आला.