रायगड - ज्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल मानव जातीसाठी पिण्याचे पाणी खुले केले. त्याच ऐतिहासिक चवदार तळ्याचे पाणी आज मितीस खराब झाले आहे, अशी खंत व्यक्त होत आहे. त्याचा विचार करून महाड नगरपालिकेने जैव स्वच्छता पध्दतीचा वापर करून चवदार तळ्याचे पाणी शुध्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -आक्षी गावातील मराठीतील 'हा' पहिला शिलालेख नामशेष होण्याच्या मार्गावर
ऐतिहासिक चवदार तळे ही महाड शहराची ओळख आहे. महाड नगरपालिकेने चवदार तळ्याचे सुशोभिकरण केले असून त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चवदार तळ्याचे पाणी पिण्यायोग्य असावे अशी मागणी केली जात आहे. भविष्यात ओझोनायझेशन पध्दतीचा अवलंब करीत चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरण करण्याचा नगरपालिकेचा प्रस्ताव आहे. मात्र, यासाठी वेळ लागणार असल्याने जैव स्वच्छता पध्दतीने चवदार तळ्याचे पाणी स्वच्छ केले जाणार असल्याचा निर्णय नुकत्याच महाड नगरपालिकेमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला.
ऐतिहासिक चवदार तळ्याचे पाणी होणार शुद्ध, शुद्धीकरणासाठी महाड नगरपालिका करणार जैव स्वच्छता पध्दतीचा वापर यासाठी एका विशिष्ट पध्दतीने बनवलेल्या जैवीक पदार्थाचे तुकडे चवदार तळ्याच्या पाण्यात टाकण्यात येणार असून ते पाण्यात मिसळून हे पाणी शुध्द होणार आहे. त्यासाठी नगरपालिकेने निविदा मागवल्या असून हे काम कंत्राट पध्दतीने दिले जाणार आहे. यामुळे चवदार तळ्याचे पाणी पिण्यायोग्य होणार नसले तरी दुर्गंधी रहित, जलचरांना पोषक असे बनणार असल्याचा दावा महाड नगरपालिकेने केला आहे.
हेही वाचा -किल्ले रायगडला मंजूर केलेला 20 कोटी निधी अखेर वितरित