अलिबाग (रायगड) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर होऊन दीड महिना उलटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. असे असले तरिही कोरोना प्रतिबंध क्षेत्र वगळून सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे आज (सोमवार) दुकाने उघडली जाणार होती. यामध्ये दारूच्या दुकानांचाही समावेश आहे. मात्र, दुकाने सुरू करण्याच्या आदेशाबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम झाल्याने बहुतेक सर्वच दुकाने बंद असल्याचे पहायला मिळाले. तसेच जिल्ह्यात दारूची दुकाने उघडली नसल्याने मद्यपी देखील नाराज झाले.
अलिबाग शहरात दुकाने बंद... हेही वाचा...पहिला लाभार्थी 'मीच', मद्य मिळवण्यासाठी तळीरामांमध्ये चढाओढ.. मद्यविक्री दुकानांसमोर रांगा
रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका क्षेत्र हे मुंबई क्षेत्रात जोडले गेले आहे. त्यामुळे उर्वरित 15 तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कमी असल्याने रायगड हा ऑरेंज झोनमध्ये आला. शासनाने 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. असे असले तरिही कोरोनाबाधित क्षेत्र वगळून दुकाने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आज 4 एप्रिल रोजी जिल्ह्यातील दुकाने उघडली जाणार होती. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून दुकाने सुरू करण्याबाबत योग्य अध्यादेश निघाला नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यात दुकाने सुरू होणार कळल्यावर नागरिकांनी बाजारपेठेमध्ये गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
मद्यपींची घोर निराशा...
आजपासून दारू विक्री सुरू होणार आणि दुकाने उघडली जाणार, असे राज्य उत्पादन विभागाने जाहीर केले होते. त्यामुळे आज रायगज जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर सकाळपासूनच मद्यपींनी गर्दी केली होती. मात्र, वाइन शॉप न उघडल्याने मद्यापींना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले आहे.