रायगड- मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रात पोहण्यास गेलेल्या पर्यटकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला होता. समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांच्या प्रसंगावधानमुळे पर्यटकाला वाचविण्यात यश आले आहे. सलीम शेख, असे वाचलेल्या पर्यटकांचे नाव असून राकेश रक्ते, असे वाचविणाऱ्या जीवरक्षकांचे नाव आहे. ही घटना आज (दि. 26 ऑगस्ट) दुपारी घडली आहे.
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सध्या रायगडात पुन्हा पर्यटन बहरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथील सलीम शेख हे आपल्या कुटूंबासह मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी दुपारच्या सुमारास पर्यटनास आले होते. यावेळी त्यांना समुद्र स्नानाचा मोह आवरला नाही. त्यामुळे ते आणि त्याचे पाच भाऊ समुद्रात पोहण्यास गेले. तर दोन जण किनाऱ्यावर होते. भाऊ हे पोहत असताना सलीम शेख हे खोलवर समुद्रात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. अशाही परिस्थितीत ते आपला जीव वाचविण्यासाठी पंधरा मिनिटे पोहत होते. मात्र, उलट्या दिशेने पोहत असल्याने आता आपण वाचणार नाही, असे त्यांना वाटत होते. त्यावेळी त्याच्या भावांनी आणि किनाऱ्यावरील पर्यटकांनी मदतीसाठी आरडा ओरड केली.