रायगड- अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्यात चक्क छोटे जिवंत कोळंबी मासे येत असल्याचा प्रकार घडला आहे. येथील ग्रामस्थांना आधीच पंधरा दिवसातून एक वेळेस पाणी मिळते. त्यात असा प्रकार घडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
15 दिवसातून मिळते एकदा पाणी त्यातही 'कोळंबी मासे.... हेही वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींची घेणार भेट
अलिबाग शहराला लागून असलेल्या खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत. येथील ग्रामस्थांना दहा ते पंधरा दिवसांनी एकदा एमआयडीसीचे पाणी मिळते. नळाद्वारे आलेले पाणी ग्रामस्थांना साठवून ठेवावे लागते. मात्र, या पाण्यामधून जिवंत कोळंबी मासे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याप्रकरणी गंभीर होऊन हा प्रश्न सोडवावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
खंडाळे ग्रामपंचायतीची पाणी समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना राबवली होती. मात्र, या योजनेत करोडोचा घोटाळा होऊन ही योजनाच राजकारण्यांनी गिळून टाकली. त्यामुळे खंडाळा ग्रामस्थ आजही तहानलेलेच आहेत. आजही ग्रामस्थांना बाहेरुन विकत पाणी घ्यावे लागत आहे. मात्र, ग्रामस्थांची ही समस्या ना प्रशासन सोडवत आहे ना लोकप्रतिनिधी.