रायगड - मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील जमीन घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मनीषा वायकर याच्या विरोधात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात 402 पानी तक्रार दाखल केली आहे. अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्याकडे हा तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल कोर्लई जमीन घोटाळ्यात फसवणूक केल्याचा आरोप
२ मार्च रोजी याबाबत ईमेलवर रेवदंडा पोलिसांना किरीट सोमय्या यांनी अर्ज पाठविला होता. आज प्रत्यक्ष रेवदंडा पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी तक्रार दाखल केली आहे. सात दिवसात ठाकरे व वायकर परिवराविरोधात गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. कोर्लई जमीन घोटाळ्यात फसवणूक, वन जमिनीवर अतिक्रमण केल्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोर्लई येथे ९ एकर जागा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे रवींद्र वायकर यांनी ही जागा भेट दिली आहे. या जमिनीवर रश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांची नावे आहेत. अनव्य नाईक यांच्याकडून ही जागा विकत घेतली आहे. ही जमीन खरेदी करताना आर्थिक घोटाळा आणि कागदपत्रांची फेरफार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे.
किरीट सोमय्याेचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या व मनीषा वायकर यांच्या नावे कोर्लई येथे जागा आहे. या जागेत १९ घरे असल्याचेही सोमय्या याचे म्हणणे आहे. या घराची घरपट्टी कोर्लई ग्रामपंचायतीकडे भरली जात आहे. मात्र, घराबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लपवली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांवर कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले होते.
अखेर आज दाखल केली तक्रार
जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई जमीन घोटाळ्याबाबत करीत नसल्याने अखेर किरीट सोमय्या यांनी कायदेशीर लढाई देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आज रेवदंडा पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी ४०२ पानी पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. सात दिवसात पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
रेवदंडा पोलीस ठाण्याला छावणीचे रूप
किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री ठाकरे परिवाराविरोधात तक्रार दाखल करण्यास येणार असल्याने रेवदंडा पोलीस ठाण्याला छावणीचे रूप निर्माण झाले होते. तर चौलपासून रेवदंडा पोलीस ठाण्यापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा-तापसी पन्नू, अनुराग कष्यप आणि विकास बहलच्या घरावर आयकर विभागाची धाड
हेही वाचा-जळगाव वसतीगृहात पोलिसांनी मुलींना कपडे काढून नाचायला सांगितले, विधानसभेत गाजला मुद्दा