रायगड -फोन लावण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात प्रचंड हाणामारी झाल्याची घटना रविवारी 8 डिसेंबरला सायंकाळी खांदेरी किल्यावर घडली. या हाणामारीत पाच ते सहा जण जखमी झाले असून त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हाणामारीबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग समुद्रात असलेल्या खांदेरी किल्ल्यावर मुंबई येथून पन्नास ते साठ जणांचा एक ग्रुप सहलीसाठी आला होता. त्याचवेळी आक्षी येथील तीस ते चाळीस जणही सहलीसाठी आले होते. खांदेरी किल्ल्यात असलेल्या वेताळ देवाला मान देण्यासाठी आक्षीतील तरुणाई गेली होती. मान दिल्यानंतर आक्षीकर आणि मुंबईतील पर्यटक हे वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास बसले होते. यावेळी आक्षी मधील एकाने मुंबईच्या पर्यटकांकडे फोन करण्यासाठी मोबाईलची मागणी केली. त्यावेळी मुंबईतील पर्यटकाने त्याला नंबर सांग फोन लावतो असे सांगितले. याचा राग आक्षीकर व्यक्तीला आला आणि त्याने मुंबईच्या पर्यटकांचा मोबाईल पाण्यात फेकला. त्यावरून बाचाबाची दोन्ही गटात झाली. मात्र, काही वेळाने सर्व शांत झाले.