रायगड :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या ठिकाणी पोहोचले आहेत. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असून मदतकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षात जावून परिस्थितीचा घेतला आढावा घेतला.
सर्वतोपरी मदत राज्य सरकार करेल : रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याच्या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणीस यांनी ट्विट केले आहे. ही घटना कळताच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल. तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असे ते म्हणाले आहेत.