रायगड -प्रदूषणामुळे कायम चर्चेत असलेल्या तळोजा एमआयडीसीतील कासाडी नदीचे रूप लवकरच बदलणार आहे. यासाठी 13 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रदूषणकारी कारखाने आणि सीईटीपीच्या माध्यमातून वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेतून हा खर्च केला जाणार आहे.
कासाडी नदीचे वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार आवाज उठवला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळासह राज्य शासनाकडे अनेक तक्रारीदेखील केल्या आहेत. नागरिकांच्या वतीने नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे सर्व पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लवादाने प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांनावर कारवाई करण्याचे आदेश देत दंड आकारला होता.
जवळपास 15 कोटींचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. याच रकमेतून कासाडी नदीचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशा सूचना राष्ट्रीय हरित लवादाने दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने कासाडीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्याची मागणी याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर आता या कामाच्या हालचाली सुरू झाल्या असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कासाडीच्या पुनर्विकासासाठी आराखडा तयार केला आहे.
हेही वाचा -ईटीव्ही भारत ईम्पॅक्ट; कृष्णा नदीच्या प्रदूषणाची दखल, प्रदूषण महामंडळाची महापालिकेला नोटीस
याअंतर्गत, नदीपात्रातील गाळ काढणे, दगडाच्या पिचिंगने भिंत बांधणे, नदीकिनारी फेन्सिंग उभारणे, पदपथ उभारणे, नावडे गावाला लागून असलेल्या नदीपात्राशेजारी बाग उभारणे, आरसीसी भिंत उभारणे, नावडे घाटाची दुरुस्ती, एम्पिथिएटर, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा विकसित करणे, अशा अनेक गोष्टीं केल्या जाणार आहेत. माजी न्यायमूर्ती कानडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची लवकरच एक बैठक होणार आहे. त्यानंतर कासाडी नदीच्या पुर्नविकासाचे काम कोणते प्राधिकरण करणार, हे स्पष्ट होईल.