रायगड-येथील पेण तालुक्यातील जुई-अब्बास हद्दीतील शासनाची १०० एकर जागा गिळंकृत करण्याचा जेएसडब्ल्यू या कंपनीचा डाव आहे, असा आरोप रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी केला आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला आहे.
हेही वाचा-जनसामान्यांचा पक्ष मूठभरांचा करू नका, पंकजा मुंडेंचा भाजप राज्य नेतृत्त्वाला अप्रत्यक्ष टोला
डोलवी येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीने या परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक जागा घेतल्या आहेत. या कंपनीच्या भरावामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भातशेती नापिक झाली आहे. येथील धरमतर खाडी किनारी असणारी कांदळवन सुध्दा या कंपनीने बुजवून टाकले आहेत. खाडी किनारी मातीचा भराव करत जेएसडब्ल्यू कंपनी वाढीव प्लॅन्टसाठी कासू भागातील जुई-अब्बास येथील शासनाच्या ११७ सर्वेनंबरमध्ये असणारी १०० एकर जागा जेएसडब्ल्यू कंपनी गिळंकृत करण्याच्या तयारीत आहे, असा गौप्यस्फोट संजय जांभळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
यातील २५ एकर जागा स्थानिक नागरिक कसत आहेत. मात्र, कंपनी आणि शासनाचे अधिकारी यांच्यात काहीतरी साटेलोटे असून ही जागा कंपनी गिळंकृत करणार असल्याचा डाव आहे. मात्र, शासनाने सदर जागा कंपनीला देऊ नये अन्यथा या भागातील शेतकरी मोठे जनआंदोलन ऊभे केल्याशिवाय राहणार नाही. तसेच कंपनीच्या प्रदूषणाबाबत आपण आवाज उठविला असून याची तक्रार एक महिना अगोदरच प्रदूषण मंडळलासह जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. मात्र, याबाबतचा कोणताही खुलासा आजतागायत आला नसल्याने आपण या सर्वांना न्यायालयात खेचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जुई-अब्बास येथील सर्वेनंबर ११७ मधील १०० एकर जागा सरकारी खाजण असून या जागेचे सातबारा व फेरफार काढण्याचे काम प्रांताधिकारी यांच्या आदेशानूसार चालू आहे. मात्र, सदर जागेचे सातबारे जेएसडब्ल्यू कंपनीसाठी आहेत का? हे मला माहीत नाही असे तलाठी विना कोरेगावकर यांनी सांगितले.
जुई-अब्बास येथील सरकारी जागा जेएसडब्ल्यू कंपनी घेत नसून, या संदर्भात कोणताही कंपनीशी संबंध नाही. कंपनीकडे भरपूर जागा उपलब्ध आहे, असे आत्माराम बेटकेकर (जनसंपर्क अधिकारी, जेएसडब्ल्यू कंपनी) यांनी सांगितले आहे.