रायगड - रेवदंडा समुद्रकिनारी सुरू असलेल्या अनधिकृत टेंट कॅम्पनिंग व्यवसायावर महसूल यंत्रणेने जेसीबी फिरवला. त्यामुळे रेवदंडा समुद्रकिनारा हा मोकळा झाला आहे. महसूल विभागाने केलेल्या या कारवाईने स्थानिक व्यवसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. टेंट व्यवसायलाही नियमावली बनवून हा व्यवसाय करण्याची परवानगी द्या, अशी मागणी येथील व्यवसायिकांनी केली आहे.
आठ ते दहा वर्षांपासून सुरू आहे टेंट कॅम्पनिंग व्यवसाय
रेवदंडा समुद्रकिनारी शासकीय मलक्षेत्र असलेल्या जागेत आठ ते दहा वर्षांपासून टेंट कॅम्पनिंग व्यवसाय सुरू आहे. पूर्वी काही मोजकेच स्थानिक हा व्यवसाय करीत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून 53 टेंट कॅम्पनिंग व्यवसायिक व्यवसाय करू लागले. टेंटमध्ये राहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रेवदंडा समुद्रकिनारी येऊ लागले होते. मात्र समुद्रावर बसून मद्य घेणे, डीजे लावणे हे प्रकार वाढू लागले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास होऊ लागला होता.
स्थानिक ग्रामस्थांनी केली होती तक्रार
बीच टेंट कॅम्पनिंग व्यवसायामुळे स्थानिक ग्रामस्थांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे अलिबाग प्रांताधिकारी यांच्याकडे याबाबत ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या व्यवसायिकांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही हा व्यवसाय राजरोसपणे सुरू होता.
अखेर महसूल यंत्रणेने फिरवला जेसीबी
ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारी, त्याचबरोबर प्रशासनाची कोणतीही परवानगी नसल्याने अनधिकृतपणे टेंट कॅम्पनिंग सुरू होते. अखेर प्रांताधिकारी मनैश घोष यांनी टेंट कॅम्पनिंग बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात केली. महसूल यंत्रणा, पोलीस यांच्या मदतीने समुद्रकिनाऱ्यावरील अनधिकृत बांधकाम जेसीबीने भुईसपाट केले. त्यामुळे रेवदंडा समुद्रकिनारा हा आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे.
टेंट व्यवसायाला नियमावली बनविणे गरजेचे
शासन हे समुद्रकिनारी गोवा धर्तीवर शॉक पॉलिसी राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच धर्तीवर टेंट कॅम्पनिंगसारख्या व्यवसायलाही नियमावली बनवली तर या व्यवसायातून स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे शासनाने या व्यवसायासाठी नियमावली बनवली तर पर्यटनाला अजून चालना मिळू शकते.