महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Irshalwadi Landslide rescue operation: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 26 वर, बचावकार्याला पुन्हा सुरुवात - नीलम गोऱ्हे इर्शाळवाडीत दाखल

इर्शाळवाडीत आज पुन्हा बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. बचाव कार्याचा आज तिसरा दिवस असून या दुर्घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बचावकार्यात साधरण 1 हजार कर्मचारी काम करत आहेत. राज्य सरकारने इर्शाळवाडीतील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोमार्फत इर्शाळवाडीतील नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

इर्शाळवाडीतील बचावकार्याला पुन्हा सुरुवात
इर्शाळवाडीतील बचावकार्याला पुन्हा सुरुवात

By

Published : Jul 22, 2023, 10:19 AM IST

Updated : Jul 22, 2023, 1:15 PM IST

रायगड : इर्शाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी आदिवासी पाड्यावर बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत मृतांची संख्या 26 वर पोहोचली. या गावात राहणाऱ्या 48 कुटुंबातील 228 नागरिकांपैकी 143 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. तर अद्यापही 87 जणांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली.

मृतांची संख्या 26 वर : मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत बुधवारी रात्री भूस्खलन झाल्याची घटना घडली होती. इर्शाळवाडीत एकूण 48 कुटुंबे राहत होती. या गावाची एकूण लोकसंख्या किती होती, याची माहिती मिळाली असून या गावात 228 जण राहत होते. भूस्खलनाची घटना घडल्यानंतर एनडीआरएफच्या दलाने बचाव कार्य सुरू केले. या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने छोटी उपकरणे घेऊन मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. बचावकार्यात 98 जणांना वाचवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

बचावकार्यात 1 हजार लोकांचा सहभाग : दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य वेगाने सुरू आहे. परंतु दुर्घटनास्थळ उंचावर असल्याने कोणतीही तांत्रिक साधने मदतीसाठी आणि शोधकार्य करण्यासाठी वापरता येत नाहीत. पाऊस आणि सर्वत्र झालेल्या चिखलामुळे शोधकार्यात अनेक अडचणी येत असल्याचे बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या बचाव कार्यात एनडीआरएफच्या 4 तुकड्यांचे 100 जवान, टीडीआरएफचे 80 कामगार, ‘इमॅजिका’चे 82 कामगार, सिडकोचे 460 कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, असे एकूण सुमारे 1 हजार जण काम करत असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. दरम्यान या दुर्घटनेत वाचलेल्या नागरिकांच्या निवाऱ्यासाठी 60 कंटेनरची सुविधा करण्यात आली आहे.

‘सिडको’मार्फत पुनर्वसन : राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. सिडको’च्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. स्थानिक माहितीवरून या आदिवासी वाडीमध्ये एकूण 48 कुटुंबे वास्तव्यास होती. त्यातील सुमारे 17 ते 18 घरांवर दरड कोसळली आहे.

हेही वाचा -

  1. Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीतील लोकांच्या दुःखात बीआरएस त्यांच्या सोबत-बाळासाहेब सानप
  2. CM On Rehabilitation Of Citizens: राज्यातील सर्वच धोकादायक दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री शिंदे
Last Updated : Jul 22, 2023, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details