रायगड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या "ब्रेक द चेन" या संकल्पनेला पाठिंबा देत आगळ्यावेगळ्या प्रकारचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. पत्रकार महेश भोइर यांचे चिरंजीव वेद भोईर याच्या वाढदिवसानिमित्त वन्यजीव निसर्ग संरक्षण या संस्थेतर्फे कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
कोरोना हद्दपार व्हावा यासाठी सामान्य माणसांचा हातभार
वाढदिवस साजरा करण्याचा उत्साह सर्वांनाच असतो. प्रत्येकजण वेगवेगळी संकल्पना घेऊन वाढदिवस साजरा करत असतो. अनेकजण मित्रमंडळी, नातेवाईक एकत्र बोलावून केक कापणे, तर साधेपणाने हा दिवस साजरा करतात. सध्या एखाद्या आदिवासी वाडीवर जाऊन तेथील नागरिकांना खाऊ, कपडे वाटप करण्याकडे जास्त कल आहे. तर काहीजण आश्रम शाळांवरील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटून आपला वाढदिवस साजरा करतात. मात्र, उरण तालुक्यातील कळंबूसरे या गावातील रहिवासी पत्रकार महेश भोईर यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस येथील आरोग्य केंद्र निर्जंतुकीकरण करून साजरा करण्यात आला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना, सर्वच गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे शासनाच्यावतीने उपाय करण्यात येत आहेत. कोरोना हद्दपार करण्यासाठी 'सामान्य माणसांचाही हातभार' या भावनेतून हा उपक्रम घेण्यात आला होता.